अंबडमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाचा चाकूने निर्घृण खून
प्रेमसंबंधातून संताप – अंबडमध्ये तरुणाचा निर्घृण खून
जालना : अंबड शहरातील पठाण मोहल्ल्यात प्रेमसंबंधातून तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
शनिवारी रात्री साडेदहा वाजता कलीम फेरोज पठाण या २६ वर्षीय तरुणावर सरफराज फेरोज शेख, फेरोज इस्माईल शेख, अवेस फेरोज शेख आणि नासेर इस्माईल शेख या चौघांनी धारदार चाकूने वार करून त्याचा निर्घृण खून केला. कलीम आणि सरफराज यांच्यातील प्रेमसंबंधाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे अंबड शहरात खळबळ उडाली आहे.
कलीमचा मृतदेह पाहून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सलीम शेख खाजा शेख यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी चौघांविरोधात खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. रविवारी पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी सरफराज फेरोज शेख जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटल परिसरात लपला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सरफराजला ताब्यात घेतले आणि अंबड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, सहायक पोलिस निरीक्षक गुरले, उपनिरीक्षक नरोडे, विष्णू चव्हाण, दीपक पाटील, स्वप्निल भिसे, अरुण मुंढे आणि भानुसे यांनी ही कारवाई केली.
अंबड शहरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.